दोघांना वाचवण्यात यश
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले मुंबईतील तीन तरुण पर्यटक समुद्रात बुडाले. त्यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यात यश मिळालं आहे. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून भीमराज आगाळे आणि विवेक शेलार हे दोघे बचावले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.7) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाल आहे.
मुंबई येथून आदर्श धनगर राहणार, प्रफुल्ल त्रिमुखी, सिद्धेश काजवे, भीमराज आगाळे व विवेक शेलार हे पाच कॉलेजमध्ये मित्र देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास आले होते. ते गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजमध्ये निवासासाठी उतरले होते. यावेळी या तरुणांनी दुपारनंतर समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचे ठरवले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी ते समुद्रात पोहत होते. त्याचवेळी त्यांच्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता ते बुडू लागले. त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले. त्यांना तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषित केले. तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.







