कर्जतमधील शेतकऱ्यांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील 40 गावांमधील जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यातील उजव्या कालव्याची दुरूस्ती तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील राजनाला कालवा हा तीन भागात विभागला असून उजवा कालवा हा कराळेवाडी, मांडवणे आणि हेदवली सावळा या भागातील शेतीसाठी आहे. परंतु, या विभागात संपूर्ण कालव्याचे पाणी सोडले जात नाही. तसेच, या उजव्या कालव्याचे काम देखील अपुर्णावस्थेत ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी या कालव्याचे रूंदीकरण कमी केल्याने पाणी कमी प्रमाणात पुढे जात आहे. त्यातच हेदवली येथील मार्गातील आणि मांडवणे येथील चाफेची नाल्याची मोरी फुटलेली आहे.ठेकेदाराने या फुटलेल्या मोरीवर सिमेंटची पिशवी टाकून त्यावर सिमेंट वरचेवर लावलेले आहे. तसेच, मार्गाच्या मोरीपासून जेथे नाला संपतो तेथपर्यंत तिथपर्यंत नाल्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे येथील शेतकरी या कालव्याचे काम पूर्ण करण्याची, फुटलेल्या मोऱ्या दुरूस्तीची व शेतीसाठी पुर्ण क्षमतेने पाणी सोडण्यावची मागणी करीत आहेत.
ज्या ठिकाणी कालव्याचे पाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या फुटल्या आहेत त्या ठिकाणच्या मोऱ्या दुरूस्त कराव्यात. तसेच, आपल्या शेतामध्ये पाणी जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्याठिकाणी नव्याने मोरी टाकावी. त्याचबारोबर कालव्याचे काम लवकर पूर्ण करून पाणी पुर्ण क्षमतेने सोडा. आम्हाला पाणी पुढच्या वर्षी मिळाले तरी चालेल मात्र, काम पूर्ण करूनच पाणी सोडावे.
– हरिश्चंद्र म्हसकर, स्थानिक शेतकरी







