जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे प्रतिपादन
| पेण | प्रतिनिधी |
मुलींनी केवळ शालेय व औपचारिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन पतंगासारखी आकाशाला गवसणी घालावी. ही भरारी घेत असताना केवळ रस्ता सुरक्षाच नव्हे तर सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या कवचांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. ते अंकुर ट्रस्ट, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेणरायगड आणि आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला पतंग महोत्सव 2026 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
13 वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचामार्फत दरवर्षी उत्साहात महिला पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. सामाजिक बांधिलकीतून महिलांविषयी सकारात्मक संदेश देणारा हा महाराष्ट्रातील पहिला महिला पतंगोत्सव असल्याचे मानले जाते. याच सामाजिक धाग्याला धरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू केला असून, आदिवासी विकास विभागाने अंकुर ट्रस्टच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंध अभियान अधिक सक्रिय केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. पेण आरटीओ माधव सूर्यवंशी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. तर आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
मा. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षिततेचा संदेश देणारा पतंग आकाशात सोडण्यात आला. त्यानंतर शेकडो तरुणींनी आपल्या रंगीबेरंगी इच्छाआकांक्षांचे पतंग आकाशात भिरकावत संक्रांतीच्या स्वच्छ आकाशात मुक्त भरारी घेण्याचा आनंद साजरा केला.







