| चौल | प्रतिनिधी |
रेवदंडा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी या बैठकीदरम्यान केले. गाफील न राहता घराघरांत जा, मतदारांशी थेट संवाद साधा आणि विरोधकांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्ष रेवदंडा आयोजित आढावा बैठक संतोष मोरे (बाबू मोरे) यांच्या निवासस्थानी रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री उत्साहात पार पडली. शेकाप-महाविकास आघाडीचे चौल-रेवदंडा-नागाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि रेवदंडा-नागाव पंचायत समितीचे उमेदवार राकेश वसंत म्हात्रे यांच्या प्रचारार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, मतदारांमधून आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे. विजय निश्चित असला तरी कार्यकर्त्यांनी निष्काळजीपणा करू नये. आपण केलेल्या विकासकामांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. विरोधकांनी विकासकामांच्या नावाखाली कसा भ्रष्टाचार केला, टक्केवारीचे राजकारण कसे राबवले, हे ठोसपणे जनतेसमोर मांडा. चौल जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जयंत पाटील यांच्यासह जि.प. उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, पंचायत समितीचे उमेदवार राकेश म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा मोरे, हेमंत गणपत, सुरेश खोत, मुझ्झफर मुकादम, सलीम गोंडेकर, संदीप खोत, संतोष मोरे, सोनाली मोरे, खलील तांडेल, रेवदंडा शहराध्यक्ष निलेश खोत आदींसह शेकापचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन शेकाप शहराध्यक्ष निलेश खोत यांनी केले. त्यांनीही मतदारांकडून आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. मतदार स्वतःहून पुढे येत आहेत. गद्दारी आणि टक्केवारी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना गाडण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही उमेदवारांनी स्वतःच्या नेत्यांना फसवून दुसऱ्या पक्षात घुसखोरी करत उमेदवारी मिळवल्याचा आरोप करत त्यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे येथील जनता गद्दारी आणि भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.
पालखीला खांदा, खंडोबा महाराजांचे दर्शन
माघ पौर्णिमेनिमित्त रेवदंडामधून काढण्यात आलेल्या खंडोबा महाराजांच्या पालखी मिरवणुकीत जयंत पाटील, जि.प. उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि पंचायत समितीचे उमेदवार राकेश म्हात्रे यांनी सहभाग घेत पालखीला खांदा दिला. यावेळी त्यांनी खंडोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.










