20 टनावरील अवजड वाहतुकीस बंदी; जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरून 20 टनांवरील अवजड वाहतुकीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, ही वाहतूक बंदी अधिसूचनेच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, पुलाची सुरक्षितता धोक्यात असल्याचे आता प्रशासन सांगत असले, तरी हा धोका अचानक निर्माण झालेला नाही. गेली अनेक वर्षे पुलावरून अवजड वाहतूक सुरू असताना संबंधित यंत्रणा नेमक्या काय करत होत्या, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला साळाव पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने पुलाच्या संरचनात्मक बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. यापूर्वी पुलावरून 12 टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. सद्यस्थितीत संबंधित कंत्राटदारामार्फत पुलाच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 20 टनांवरील जड व अवजड वाहतूक बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. संबंधित कंत्राटदाराने पुलावरून वाहतुकीसाठी काही महत्त्वपूर्ण अटी व निर्बंध सुचविले आहेत. त्यानुसार पुलावर वाहनांची कमाल वेगमर्यादा ताशी 30 किलोमीटर ठेवणे, कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होऊ न देणे तसेच दोन वाहनांमध्ये किमान 20 मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. पुलावरून होणाऱ्या अति अवजड वाहतुकीमुळे पुलास क्षती पोहोचून संभाव्य दुर्घटना घडू नये, तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षितता अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी 20 टनांवरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीचे आदेश जारी केले आहेत. तसेच, ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नसल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरचनात्मक स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर प्रशासनाला जाग आल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. या आधी या मार्गावरून पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने अनेकदा जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. त्यावेळी कठोर कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, साळाव पूलावरून अनेकदा रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांची वर्दळ दिसून येत होती. तसेच, अनधिकृत 40 टनावरील डंपर व ट्रक वाहतूक होत असल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी असूनही प्रभावी नियंत्रण का ठेवले गेले नाही? याबाबत प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
अलिबाग-मुरूड मार्गावरून ये-जा कारणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. अलिबागवरून मुरूड ये-जा करण्यासाठी वडखळ-नागोठणे मार्गे तळेखार-साळाव या मार्गाचा वापर करावा. याशिवाय अलिबागवरून बेलकडे-रोहा मार्गे तळेखार-साळाव हा मार्गही वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहेत. रेवदंडा-साळाव पुलाची सुरक्षितता, संभाव्य दुर्घटना टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने वाहनचालक व वाहतूकदारांनी प्रशासनाने या निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दुर्घटनेनंतर जागी होणारी यंत्रणा
साळाव पुलावरून 20 टनांवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातल्यानंतर संपूर्ण अलिबाग-मुरूड परिसरात एकच चर्चा रंगली आहे. साळाव पूल हा केवळ काँक्रीटचा पूल नाही, तर हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे केवळ आदेश काढून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. नियमांची कठोर अंमलबजावणी, पारदर्शक देखरेख आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली तरच जनतेचा प्रशासनावरील विश्वास कायम राहील, अन्यथा “दुर्घटना झाल्यावर जागी होणारी यंत्रणा” अशीच प्रशासनाची प्रतिमा जनमानसात अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.







