बागमळा येथे गावदेवीच्या आशीर्वादाने प्रचाराचा दमदार शुभारंभ
| चौल | प्रतिनिधी |
चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि नागाव-रेवदंडा पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार राकेश म्हात्रे यांच्या प्रचाराला नागाव ग्रामपंचायत हद्दीत जबरदस्त वेग आला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना बागमळा येथे बुधवारी (दि.4) ग्रामदेवता गावदेवी मातेचे आशीर्वाद घेऊन ज्येष्ठांच्या हस्ते नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर परिसरात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा झंझावात आणखी तीव्र झाला असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, नागाव ग्रामपंचायत हद्दीत तो शिगेला पोहोचला आहे. बुधवारी बागमळा येथे आई गावदेवी मातेचे आशीर्वाद घेऊन ज्येष्ठांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने येथील मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “आमचं मत विकासाला, आमचं मत महाविकास आघाडीला” असा निर्धार मतदारांनी व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे.
प्रारंभी नागावचे माजी उपसरपंच संदेश नाईक यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यानंतर ग्रामदेवता गावदेवी मातेचे आशीर्वाद घेऊन चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे आणि नागाव-रेवदंडा पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार राकेश म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, माजी उपसरपंच संदेश नाईक, माजी उपसरपंच संतोष घरत, विजय चौलकर, शेकाप नेते आर.डी. नाईक, रेवदंडा शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत, रेवदंडा शहराध्यक्ष निलेश खोत यांच्यासह बागमळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाल्यामुळे येथील मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी सांगितले. नागाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये विविध विकासकामे आणि योजना राबविण्यात आल्या आहेत. नागावमधील मतदार सुज्ञ असून, ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









