जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश लागू
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततेत, मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी रायगड जिल्ह्यात मतदानापूर्वी 24 तास कडक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी हा आदेश जारी केला आहे. 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
या आदेशानुसार 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजल्यापासून 7 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित मतदारसंघात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई राहील. सार्वजनिक सभा, बैठका, निवडणूक प्रचार, बल्क मेसेजिंग, लाऊडस्पीकरचा वापर यावरही बंदी घालण्यात आली आहे.
मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, वायरलेस किंवा अन्य संपर्क साधने नेण्यास मनाई असेल. तसेच या परिसरात शस्त्र, वाहन, लाऊडस्पीकर, गोंधळ, आरडाओरड, प्रचार बुथ उभारणे किंवा कोणतेही आस्थापन सुरू ठेवणे प्रतिबंधित असेल. अपवाद म्हणून निवडणूक व सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी, तसेच अपंग/वृद्ध/आजारी मतदारांना आणणारी वाहने यांना सवलत देण्यात आली आहे.
राजकीय पक्षांचे बाहेरील कार्यकर्ते किंवा मतदार नसलेले नेते यांना संबंधित मतदारसंघात थांबण्यासही मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही कृत्य करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर बुथ लावताना स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहील. प्रत्येक बुथवर केवळ एक टेबल व दोन खुर्च्यांचीच परवानगी असेल. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 223 नुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
सात फेब्रुवारीला आठवडा बाजार बंद
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो, ते सर्व बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय व गर्दीविरहित पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






