झाडावरच मोहोर पडला काळा; बागायतदार चिंतेत
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
प्रसिद्ध देवगड हापूस आंबा आता नव्या संकटात सापडला आहे. यावर्षीच्या नव्या हंगामात पहिलाच मोहोर झाडावरच कोळश्यासारखा काळा पडल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत. बदलत्या वातावरणात मोहोर चांगल्याप्रकारे टिकून चांगली फळे मिळण्यासाठी महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यानंतरही गुलाबी थंडीच्या धुक्यात साठलेल्या मोहोरावर बुरशी लागली आहे.
बुरशीजन्य रोगाची ही परिस्थिती तालुक्यात प्रथमच उद्भवली असून तालुक्यातील सुमारे 99 टक्के बागायती या बुरशीजन्य रोगाच्या अधीन आहे. परिणामी, त्यात फंगल इन्फेक्शन झाले. अर्थात बुरशी निर्माण झाली. त्यात तुडतुड्याचे प्रमाणही अधिक राहिले. त्यामुळे हा संपूर्ण मोहोर कोळश्यासारखा काळा बनला. त्यात मोहोर निर्जीव झाल्याने कमी पडली नाही. तालुक्यातील 99 टक्के बागायतींमध्ये हा प्रकार दिसून आला असून हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अशा प्रकारातून मोहोराला वाचविण्यासाठी ज्या बागायतदारांनी अथक मेहनत घेतली, त्यांनाही मेहनतीचे फळ मिळाले नाही. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागायतदारांनी कीटकनाशक फवारणीच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले होते. परंतु, बुरशीजन्य रोगाने झाडावरील मोहोरच गिळकृत नव्हे, तर चक्क फसवाच निघाल्याने बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
यावर्षी नव्या हंगामात आंबा कलमांना चांगल्याप्रकारे मोहोर आला होता. त्यामुळे बागायतदार ही खूश होते. हा मोहोर टिकवून चांगली फळे मिळण्यासाठी बागायतदारांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी देखील केली. तसेच यावर्षी थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने लवकरात लवकर फळधारणा होईल, अशी अपेक्षा बागायतदार बाळगून होते.
कृषी विद्यापीठाने आंबा हंगामात बदलत्या वातावरणात बागायतदारांनी फळझाडांची निगा कशी राखावी? कोणत्या किटकनाशकांचा वापर करावा? आदी माहितीचे मार्गदर्शक बुलेटीन आठवड्यात किमान एकदा प्रकाशित करणे आवश्यक आहे. जेणेकरून या बुलेटीनद्वारे सर्व बागायतदारांना चालू परिस्थितीची माहिती होईल. आंबा बागायतदारांच्या प्रश्नांना शासनदरबारी आवाज उठविण्यासाठी, विविध संघटना संशोधक यांच्याशी बागायतदार संघटनांचा अथवा आंबा बागायतदारांचाही योग्य समन्वय दिसून येत नाही.







