आठ जणांविरोधात गुन्हा दाखल; शिंदे गटातील आरोपी मोकाट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयासमोर मुद्दामपणे फटाके लावण्याचा प्रयत्न शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केला. त्यांना रोखले असता, शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राडा केला. लाकडी दांडग्याने मारहाण करण्याबरोबरच धक्काबुक्की केली. शिंदे गटातील गुंडगिरी सोमवारी रात्री तुलाडदेवीजवळ घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्लेखोरांना अद्याप अटक केली नसल्याने रेवदंडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
शिवसेना उबाठा पक्षातील जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.9) दुपारी जाहीर झाला. या निवडणुकीत शिंदे गटाचे सचिन राऊळ हे उमेदवार निवडून आले. पराभव झाल्याने सुरेंद्र म्हात्रे व त्यांचे कार्यकर्ते असे काही मंडळी तुलाडदेवी येथील उबाठा पक्षाच्या कार्यालयात आकडेवारीबाबत आढावा घेण्यासाठी संध्याकाळी चर्चा करीत होते. त्यावेळी शिंदे गटातील नितीन राऊत, अमित राऊत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार सचिन राऊळ यांची विजयी मिरवणूक मुद्दामपणे उबाठा पक्षाच्या कार्यालयासमोर काढली. त्या ठिकाणी फटाके लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संस्कार यांच्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्यांना फटाके न लावण्यास सांगितले. याचा राग धरून शिंदे गटातील अंकित गुरव, अमोल घरत, सिद्धेश शेणवईकर, निखील राऊत, महेंद्र घरत, अमित राऊत, विद्धेश माळी, प्रतिक माळी यांनी बेकायदेशीर जमाव करून उबाठा पक्षाच्या कार्यालयात घुसले. अजित मिसाळ यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. अंकित गुरव याने त्याच्या हातातील कोणत्यातरी साहित्याने मारहाण केली. त्यामध्ये संस्कार याला दुखापत झाली. प्रतिक गुरव याने चौलच्या माजी सरपंच रुपाली म्हात्रे यांचा हात धरून ओढला. चौल परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. या राड्यामध्ये अनेकजण जखमी झाले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाची गुंडगिरी या घटनेतून समोर आली आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटाविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, शिंदे गटातील कार्यकर्त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाला अभय देणाऱ्या रेवदंडा पोलिसांबाबत नाराजीचे सूर उमटले आहेत. याबाबत रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.







