| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) झेप घेतली आहे. त्यांची नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (दि.13) त्यांचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना निरोपही देण्यात आला आहे.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, नवनियुक्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले, जिल्हा कृषि अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त सत्यजित बडे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2002मध्ये महाराष्ट्र विकास सेवेत प्रवेश केलेल्या सत्यजित बडे यांनी गेली अडीच दशके राज्याच्या ग्रामीण व जिल्हास्तरीय प्रशासनात ठसा उमटवला आहे. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रत्येक जबाबदारीत त्यांनी कामापेक्षा परिणामांवर भर दिला आहे. 2002 ते 2007 या कालावधीत आंबेगाव आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी विकासकामांना गती दिली. 2019मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनतर ते 2023 सालापासून रायगड जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांचे काम विशेष लक्षवेधी ठरले आहे. गटविकास अधिकारी असताना विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.







