90 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील बाळसई (ता. रोहा) गावाच्या हद्दीतील मोबाईल टॉवरच्या ठिकाणी झालेल्या चोरीप्रकरणी नागोठणे पोलिसांनी चार चोरट्यांना अवघ्या बारा तासांत जेरबंद केले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सदर गुन्ह्याची उकल करण्यात आली. चोरट्यांकडून पोलिसांनी एकूण 90 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागोठणे पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोपींमध्ये सागर गणेश बनकर (28), त्याचे साथीदार सुनिल रघुनाथ लोखंडे (32), दिनेश गणेश बनकर (26), सर्व रा. रामनगर नागोठणे, ता. रोहा यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासोबत विधीसंघर्षीत बालक (17) रा. रामनगर नागोठणे हा देखील सहभागी असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बाळसई गावाचे हद्दीतील मुंबई-गोवा महामार्ग लगत असलेल्या इंडस कंपनीच्या एअरटेल मोबाईल टॉवरच्या शेल्टर केबीनचा कडी कोयंडा व लॉक तोडून चोरट्यांनी शेल्टर केबीनमधील पॉवर केबल व ॲमरॉन कंपनीची बॅटरी असा एकूण 40 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरी व घरफोडी केल्याप्रकरणी इंडस कंपनीचे सुपरवायझर रोशन मांडे (34), रा. मेघना सिटी, वरसगाव, ता.रोहा त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राजेंद्र भोनकर यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा प्रसाद गोकुळे व नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र भोनकर व पथकातील पो.ह. राकेश राऊळ, पो.शि. विक्रांत बांधणकर, पो.शि. बळी पुटेवाड यांनी कसून व योग्य रीतीने करीत असताना सदर गुन्ह्याबाबत कसोशीने व कौशल्यपुर्ण माहिती घेऊन तसेच गोपनीय सूत्रांकडून माहिती घेऊन गुन्हा दाखल झाल्यापासून 12 तासांच्या आत गुन्ह्याची उकल केली.




