| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे. या आघाडीमध्ये दोन पक्ष असून या पक्षातून निवडून आलेल्या 10 सदस्यांनी गट नोंदणी प्रक्रिया रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, गटनेत्या म्हणून बीड बुद्रुक गणांमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नमिता घारे यांची निवड करण्यात आली आहे.
कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. त्यात कर्जत परिवर्तन आघाडीचे 10 आणि महायुतीचे 2 सदस्य निवडून आले. महायुती मध्ये शिवसेना शिंदे गटाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य निवडून आला आहे. कर्जत परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन पक्ष आहेत. या दोन पक्षाचे 10 सदस्य निवडले गेले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 सदस्य निवडले गेले आहेत. कर्जत पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक लवकरच होणार असून सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आहे.सभापती आणि उप सभापतीपदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका नको म्हणून कर्जत परिवर्तन विकास आघाडी मध्ये निवडून आलेल्या सर्व 10 सदस्यांची गट नोंदणी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्जत परिवर्तन विकास आघाडी अशी गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून गटनेता म्हणून नमिता सुधाकर घारे यांची निवड करण्यात आली आहे.घारे या बीड बुद्रुक या पंचायत समिती गणांमधून सर्वसाधारण महिला राखीव जागेवरून निवडून आल्या आहेत.







