| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खंडाळा बोगद्याआधी तसेच बोगद्याजवळ दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्याजवळ वाहने संथ गतीने पुढे सरकत असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन दोन्ही दिशांनी प्रवाशांना विलंब सहन करावा लागला.
दरम्यान, अवघ्या आठ दिवसांपूर्वी याच मार्गावर तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली होती. त्या वेळी हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते. अन्न-पाण्याची टंचाई, इंधन संपण्याची भीती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठी गैरसोय झाली होती.
सध्या झालेल्या कोंडीमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनचालकांनी संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे. येत्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मुंबई-बंगळूर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर भरधाव खडी-क्रशर वाहतूक करणाऱ्या डंपरने एकामागोमाग आठ मोटारींना धडक दिली. बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यात जीवितहानी टळली असून, चार ते पाचजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कात्रज बोगद्यातून बाहेर पडताच भरधाव डंपरने इंडियन ऑइल पंपासमोर पाच वाहनांना धडक दिली. डंपरचालक वाहन न थांबवता सुसाट पुढे निघाला. त्यानंतर डंपरने स्वामी नारायण मंदिर परिसरात आणखी दोन मोटारींना धडक दिली. शेवटी भूमकर चौक परिसरात आणखी एका मोटारीला धडक देत डंपर वडगाव पुलाजवळ थांबला. दरम्यान, डंपरच्या टायरने पेट घेतला. आग भडकल्याने काहीकाळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, साहाय्यक आयुक्त अजय परमार, पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अपघातप्रवण ठिकाणी तातडीची यंत्रणा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. अपघातानंतर क्रेन वेळेवर उपलब्ध न झाल्याने डंपर रस्त्यावरून बाजूला करण्यास विलंब झाला. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी आपत्कालीन क्रेन मागवून डंपर रस्त्यावरून बाजूला काढत वाहतूक पूर्ववत केली. गतीमर्यादेचे उल्लंघन, जड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे.





