बदलत्या वातावरणामुळे पिकावर व्हायरचे संकट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात पांढरा कांदा व तोंडलीचे उत्पादन सूरू झाले असून, या मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसासह बदलत्या वातावरणामुळे कांद्यासह तोंडलीच्या उत्पादनात 30 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कांदा व तोंडलीचा माल अपूरा पडत आहे. यंदा दोन्ही उत्पादनाला भाव चांगला असताना माल नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याचे बोलले जात आहे.
चविष्ट, गुणधर्मयुक्त म्हणून अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची ओळख आहे. त्यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला प्रचंड मागणी आहे. स्थानिकांसह पर्यटकांकडून अलिबागचा पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. अलिबाग तालुक्यामध्ये यंदा 315 हेक्टरहून अधिक क्षेत्रामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. 800 हून अधिक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने कांद्याची रोपे कुजून गेली. त्यामुळे कांद्याची दुबार लागवड उशिरा झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून कांदा तयार होऊन पुण्याच्या बाजारात पाठविण्यात आला आहे. 500 हून अधिक कांद्याच्या माळा पाठविण्यात आल्या आहेत. यंदा एका माळी मागे 250 रुपयांचा भाव मिळत आहे. एक खंडी म्हणजे 80 माळी मागे 20 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. सौदीमधून देखील 28 टन हून अधिक मागणी आहे. मात्र, यंदा बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. पांढऱ्या कांद्याचे 30 टक्के उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, अलिबाग तालुक्यात तोंडलीचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन काढले जाते. पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तोंडलीची लागवड केली जाते. तालुक्यामध्ये 250 हेक्टर क्षेत्रामध्ये तोंडलीची लागवड केली असून 500 हून अधिक तोंडली उत्पादक शेतकरी असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने तोंडलीचे उत्पादनही यंदा उशिरा घेण्यात आले होते. तोंडलीचे मांडव उभारून त्यातून उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. बाजारात वेगवेगळ्या भावामध्ये जाडी व कळी अशा दोन प्रकारामध्ये तोंडली विकली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तोंडली बाजारात विक्रीला सुरुवात झाली आहे. तोंडलीच्या उत्पादनावर बदलत्या वातावरणाचा परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तोंडलीवर व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. तोंडलीचे मांडव पिवळे पडत असून तोंडली गोल बनत आहेत. त्यामुळे उत्पादनात 25 टक्के घट होण्याची भिती निर्माण झाली आहे. यंदा तोंडलीला किलोमागे 80 ते 90 रुपये भाव मिळत आहे. परंतु, उत्पादन कमी असल्याने ते बाजारात शंभर टक्के पोहचविणे कठीण होऊन बसले असल्याचे सांगण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे पांढऱ्या कांद्यासह तोंडली उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कबाडकष्ट करून उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.
तोंडलीला यंदाही प्रचंड मागणी असून चांगला भाव आहे. मात्र, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तोंडलीचे मांडव पिवळे पडत आहे. त्यामुळे उत्पादन आणखी घटण्याची भिती निर्माण झाली आहे. यंदा बदलत्या वातावरणाचा कांद्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे.
-सतिश म्हात्रे,
शेतकरी
यंदा पाऊस लांबणीवर गेला. त्यामुळे कांदा व तोंडली उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी या दोन्ही पिकांचे उत्पादन पंधरा दिवस ते एक महिना उशीला निघाले. त्यामुळे उत्पादनात 25 ते 30 टक्के घट झाली आहे. तोंडली व अन्य पिकांवर काही परिणाम झाला असल्यास शेतकऱ्यांशी सोशल मिडीयाचा आधार घेत संवाद साधून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.
-मोहन सुर्यवंशी,
मंडळ कृषी अधिकारी







