इंदिरा गांधी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत; श्वानदंशाच्या औषधांसाठी नागरिकांची प्रतीक्षा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका हा आता तिसऱ्या मुंबईच्या वाटेवर आहे. असे असतानाही या तालुक्यात अत्याधुनिक व सुसज्ज असे एकही हॉस्पिटल नाही. त्यामुळे येथील जनतेला आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच येथील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय हे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असून श्वानदंशासारखी औषधे वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे उरणच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा सुविधा मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उरण तालुक्यात अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त एकही हॉस्पिटल नसल्याने येथील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. उरणमध्ये 35 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात आजही वैद्यकीय सुविधा अपुरी आहे. त्यामुळे उरणकरांना शेजारच्या पनवेल तालुक्यातील किंवा मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही महापालिकेच्या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. तर, काही वेळा येथील उद्योग आणि खासगी व्यवसायिक यांच्याकडे मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. उरणमध्ये महिन्याला 350 पेक्षा अधिक श्वानदंश होण्याच्या घटना घडत आहेत. इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय हे तालुक्यातील अँटी रेबीज औषध आणि धनुर्वात प्रतिबंध टी.टी.च्या औषधांसाठीचे एकमेव रुग्णालय आहे. परंतु, याच रुग्णालयात आता श्वानदंशानंतर लागणाऱ्या औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दर आठवड्याला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून औषधे मागवावी लागत आहेत. त्यामुळे या औषधांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना येथे कायम प्रतीक्षा करावी लागते.
वाढत्या आजारांमुळे व न परवडणाऱ्या खासगी उपचारांमुळे सामान्य नागरिक या गांधी ग्रामीण रुग्णालयात येत असतात. त्यामुळे औषधांचा तुटवडा झाल्याने रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु आहे. दररोज 300 पेक्षा अधिक रुग्ण या रुग्णालयात येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही शासनाकडून तात्काळ औषधपुरवठाबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर, काही वेळा जीव गमावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे श्वानदंश झाल्यानंतर या अतिमहत्त्वाच्या औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे. या आधी उरणमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज शासकीय रुग्णालयासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच, शासनाने 2010 मध्ये शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देखील दिली आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून या रुग्णालयाच्या नवीन आराखड्याची प्रतीक्षा कायम आहे.
काही दिवसांपासून अँटी रेबीज औषधांचा साठा पुरेसा नव्हता. त्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाकडून ही औषधे मागविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत औषधपुरवठा केला जात आहे. श्वानदंशाची संख्या वाढल्याने व्यवस्थेवर ताण आहे.रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत.
-डॉ. बाबासाहेब काळेल,
अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय







