कार्यकारी संचालक जलसंपदा विभागाचे आश्वासन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात राज्य सरकार कडून पोश्री नदीवर बोरगाव येथील पोशीर आणि चिल्हार नदीवर शिलार गावाच्या हद्दीत शिलार धरण बांधले जाणार आहे. या दोन्ही धरणांचे जलाशय ज्या भागात होणार आहे. त्या भागाची पाहणी जलसंपदा विभागाचे संचालक अतुल कपोले यांच्याकडून पाहणी करण्यात आली. दरम्यान, यावेळी उपस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या असता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत कोणत्याही ठिकाणी धरणाचे काम सुरू केले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्र शासनाने कर्जत तालुक्यात पोश्री आणि चिल्हार नदीवर धरणे बांधण्यात येतील असे जाहीर केले आहे. मे 2025 मध्ये शासनाने पोश्री नदीवर पोशीर आणि चिल्हार नदीवर शिलार ही धरणे मंजूर केली आहेत. शासनाने नुकत्याच या दोन्ही धरणासाठी निविदा काढून प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, या दोन्ही धरणांना स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जत तालुक्यातील ही दोन्ही धरणे व्हावीत यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे राज्याचे जलसंपदा विभागाचे संचालक आणि कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी पाहणी करण्यासाठी धरण परिसराला भेट दिली. कोकण विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता फुंदे, कार्यकारी अभियंता संजीव जाधव यांनी धरणाच्या परिसराला भेट दिली. सुरुवातीला या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिलार धरण परिसरात पोहचले, त्यावेळी अनेक स्थानिक शेतकरी अधिकारी वर्ग उपस्थित होण्याआधी हजर होते. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी तुम्ही घेतल्या नाहीत आणि आम्ही जमिनी दिलेल्या नाहीत असे असताना तुम्ही या जमिनीवर हक्क कसे दाखवू शकता? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पोशीर धरणाच्या मुख्य बांध होणार आहे त्या ठिकाणी देखील शेतकरी वर्ग आक्रमक झालेला दिसून आले. पोशीर आणि शिलार या दोन्ही धरणांची कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे शेवटी जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी तेथे उपस्थित असलेले ठेकेदार आणि अधिकारी वर्ग यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास देऊ नका असे जाहीर आश्वासन दिले.
शिलार धरण..
पुणे येथील राज्यस्तरीय तांत्रिक समिती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने प्रशासकीय मंजुरी दिली आणि मंत्रिमंडळाने अंदाजित 4,869.72 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळ हा प्रकल्प राबवणार आहे. मुंबई महानगर, पनवेल, नवी मुंबई महापालिका यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. कर्जत तालुक्यातील किकवी गावाजवळ शिलार नदीवर हे धरण प्रस्तावित असून 6.61 टी.एम.सी.पाणीसाठा होण्याचा अंदाज आहे.
पोशीर धरण..
पोश्री नदीवरील पोशीर प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (33.96 टक्के), नवी मुंबई महानगरपालिका (43.53 टक्के,) उल्हासनगर महानगरपालिका (9.56 टक्के), अंबरनाथ नगर परिषद (7.07 टक्के), बदलापूर नगर परिषद (5.88 टक्के) या संस्थांना धरणातील पाण्याची हिस्सेदारी निश्चित आहे.
कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार या दोन्ही धरणात बाधित होणारे सर्व शेतकऱ्यांचे समाधान होत नाही आणि शेतकऱ्यांना मागण्या पूर्ण होत नाही तोवर धरणाचे काम सुरू होणार नाही.
अतुल कपोले
कार्यकारी संचालक,
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ







