जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
इस्त्रायल-इराण संघर्षामुळे मध्य पूर्व आशियन देशात रायगड जिल्ह्यातील वीस नागरिक अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. हे सर्व नागरिक सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाली, उरणसह पोलादपूरमधील नागरिकांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या इस्त्रायल आणि इराण या देशांमध्ये एकमेकांविरोधात संघर्ष सुरु आहे. युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे विमाने उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. विमान रद्द झाल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत. रायगड जिल्ह्यातील वीस नागरिक मध्य पूर्व आशियन देशात अडकले आहेत. यातील पालीमधील उत्कर्ष मपारा हे दुबई येथे शिक्षणासाठी गेले आहेत. ते त्यांच्या आई, वडिलांच्या संपर्कात असून, सुरक्षित आहेत.
उरण तालुक्यातील जसखार येथील कविश घरत, प्रांजली घरत हे दुबई येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पर्यटनासाठी गेले आहेत. ते दुबई येथे एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. पोलादपूरमधील सवाद येथील सर्फराज तार्लेकर, अख्तर तार्लेकर, अजीम तार्लेकर, महम्मद तार्लेकर, असलम तार्लेकर, मैनुद्दीन तार्लेकर हे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. परंतु, युद्धजन्य परिस्थितीमुळे मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत. पोलादपूरमधील सवाद येथील जमीर तार्लेकर, जावेद तार्लेकर, सुवेल तार्लेकर, रतिक नैकवारे, अलताब पठाण, अल्तमश पठाण, आयान तार्लेकर हे कुवत येथे नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यस आहेत. शाहिद कादिरी, मुजाईद कादिरी, शाहिद तौलकर हे कतार येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यस आहेत. सज्जाद तार्लेकर हे दुबईला नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. या सर्वांना मायदेशी येण्याची इच्छा झाली आहे. ही सर्व मंडळी सुखरूप असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







