प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वासाला फुटले पंख
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दी मधील आगरी समाज हॉल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना विरले यांच्या संकल्पनेतून नेरळ-कोल्हारे परिसरात ‘सावित्रीच्या लेकी’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
धामोते येथील हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात 7 मार्च रोजी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला नवीन उद्योगासाठी तसेच घरगुती बनवलेल्या वस्तू बाजारात विक्रीसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच प्रत्यक्ष कृतीतून महिलांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ज्योत्स्ना विरले यांनी हे प्रदर्शन आयोजित केले होते. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील महिलांसाठी हे सर्व स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे परिसरातील घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक महिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन मांडले असून, यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रदर्शनात घरगुती दैनंदिन वापराच्या वस्तूंसह आयुर्वेदिक औषधे, विविध प्रकारचे मसाले, तयार कपडे, घरगुती खानावळ, हस्तनिर्मित ज्वेलरी असे तब्बल 20 ते 25 पेक्षा जास्त स्टॉल्स लागले होते. महिलांनी स्वतः तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजक ज्योत्स्ना विरले यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उद्योजिका तसेच होमगार्ड आणि पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनामुळे हुतात्मा हिराजी पाटील सभागृह महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते.







