निवडक कारवाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
| उरण | प्रतिनिधी |
उरणमधील द्रोणागिरी नोड परिसरात सिडकोच्या जमिनीवर आणि रस्त्यांच्या कडेला फोफावलेल्या अतिक्रमणांवर अखेर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. या मोहिमेत अनेक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली असली, तरी काही विशिष्ट अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामे वाचवल्याने सिडकोच्या दुटप्पी भूमिकेवर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
द्रोणागिरी नोड परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढली होती. रस्त्यांच्या दुभाजकावर आणि रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथवर अनेक अनधिकृत बांधकामे केली आहेत. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या तक्रारींची दखल घेत सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी अमित रजपुत यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडकोचे विशेष सुरक्षा पथक आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
सिडकोने एका बाजूला काही कच्ची आणि पक्की बांधकामे पाडली असतानाच, दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक मोठ्या अनधिकृत टपऱ्या, कॅन्टीन आणि झोपड्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. पथकाने या बांधकानांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने ही कारवाई नेमकी कोणासाठी, असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवणाऱ्या प्रशासनाने बड्या हितसंबंधांच्या टपऱ्या आणि कँटीनला सिडकोने ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण परिसरातील सर्वच अनधिकृत बांधकामे हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, अशा अर्धवट कारवाईमुळे सिडको प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. याविषयी सिडकोचे अतिक्रमण पथकाचे अमित रजपुत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.







