वणवा विझवण्यात वन विभागाला अपयश
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान डोंगरात सायंकाळी वणवा लागला आणि त्या वणव्याचा भडका फार मोठ्या प्रमाणावर उडाला. त्यामुळे जुम्मापट्टी भागातील संपूर्ण डोंगर वणव्याच्या भक्ष्यस्थानी आल्याने संपूर्ण डोंगर काळा पडला आहे.हा वणवा विझवण्यासाठी वन विभागाचे नेरळ-माथेरान तसेच कर्जत पश्चिम येथील कर्मचाऱ्यांनी रात्री प्रयत्न केले. मात्र, ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जुम्मापट्टी धसवाडी या आदिवासी वाड्यांच्या खाली असलेली डोंगराला सायंकाळी वणवा लागला. या डोंगर भागात मागील अनेक दिवस सातत्याने वणवे लागत आहेत. मात्र, वन विभाग अशा बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याने वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे पर्याटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानकडे जाणारा रस्ता वनव्यामुळे काळा पडला आहे. तसेच, वणवा लागून येथील वनराई देखील नष्ट होत असून अनेक वन्य प्राण्यांचा वावर धोक्यात आला आहे.
अशातच माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी या आदिवासी वाडीच्या खालच्या बाजुस संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास वनवा लागला. त्यावेळी हा वणवा कमी स्वरूपाचा होता. मात्र, या ठिकाणी वन अधिकारी वेळेवर पोहचले नाहीत. त्यामुळे वणव्याचा भडका आणखी वाढला. वणवा रोखण्यासाठी नेरळ वन विभागाची टीम रात्री नऊ वाजता पोहचली. त्यानंतर त्यांच्या मदतीला कर्जत येथून देखील वन कर्मचारी आले. मात्र, हा वणवा एकाच वेळी किमान एक किलोमीटर परिघात लागला असल्याने सर्वांची धावपळ होत होती.





