बदलत्या हवामानाचा मोहराला फटका
| म्हसळा | प्रतिनिधी |
अचानक झालेल्या हवामानाच्या दुष्टचक्राचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना बसला असून, मोठ्या प्रमाणात आलेला मोहोर करपल्याने फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकांना आंब्याची एप्रिल अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यादरम्यान, शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी सर्वसामान्य बागायतदारांकडून होत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साधारण 25 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन मिळते. यंदा नोव्हेंबर नंतर थंडी सरू होताच आंब्याला मोहर धरण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील म्हसळा, मुरुड, माणगाव आणि श्रीवर्धन हे तालुके आंबा उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यातील म्हसळा तालुक्यात सर्वात जास्त आंबा बागायतदार असून ते खारी पट्ट्यातील कोंझरी, कुंभळे, बंडवादी, पांगलोली, पांनदरे, पाभरे, कांदळवाडा, साळवीन्डे, मेंदडी, वाडंबा, केलटे, आडी आणि परिसरातील भागात अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह आंबा बागायतीवरच अवलंबून असतो. यंदा जिल्ह्यात पावसाचा जोर जवळ जवळ नोव्हेंबरपर्यंत असल्याने आंब्याला पालवी फुटण्यात वेळ लागला. त्यातच जानेवारी महिन्यात पडलेली कडाक्याची थंडी तसेच होळी नंतर वाढलेली उन्हाची झळ या अचानक हवामनातील बदलामुळे बागांमधील मोहर करपला आहे. पर्यायाने त्याचा फटका फळाला पोचला असल्याने बागायतदार काहीसा हवालदिल झाला आहे. कडक उन्हामुळे पुनरमोहर फुटण्याची शक्यता देखील धूसर झाली आहे. त्यामुळे बागायतदारांवर आर्थिक संकट येण्याची भीती निर्माण झाली असून याबाबतीत शासनाने योग्य निर्णय घेण्याची मागणी सर्वसामान्य बागायतदारांकडून होत आहे.
हवामानाच्या सततच्या बदलामुळे म्हणजे थंडी, उष्णता यामुळे सुरुवातीला भवरलेला मोहोर पूर्णपणे करपला आहे. काही प्रमाणातच झाडावर फळ पकडले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात आहेत. शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष देऊन नुकसानीची तजबीज करावी.
अनिल टिंगरे,
बागायत दार







