हॉटेल्स बंद होण्याची वेळ
| कोलाड | प्रतिनिधी |
इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मूझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्याने भारतातील एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम हॉटेल्स, टपऱ्या आणि खाद्य व्यवसायावर होत असून, अनेक ठिकाणी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
गॅस उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांना चुली किंवा लाकडाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी अधिक वेळ लागत असून, ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी, व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, कामगारांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गॅसचा काळाबाजार वाढल्याची चर्चा असून, सिलिंडर जादा दराने विकले जात असल्याचे समोर येत आहे. घरगुती गॅससाठीही नागरिकांच्या रांगा लागत असून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच काही ठिकाणी सबसिडीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याची चर्चा आहे. गॅस अभावी चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून ऑर्डर पूर्ण करता येत नाहीत. लवकर गॅस मिळाला नाही तर हॉटेल बंद करण्याची वेळ येईल, अशी प्रतिक्रिया सुकेली येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद उंबरे यांनी दिली.






