उन्हाळी वेळापत्रकात 30 नवीन मार्गांचा समावेश
| चिरनेर | प्रतिनिधी |
नवी मुंबईतून हवाई प्रवासाला मोठी गती मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा केली असून, 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 46 शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडणार आहे.
या नव्या वेळापत्रकात 30 नवीन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना देशातील प्रमुख शहरांमध्ये अधिक वेगवान, सोयीस्कर आणि थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली, गोवा, बेंगळुरू आणि कोचिन या मार्गांवर सर्वाधिक उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित हवाई सेवा उपलब्ध होणार आहे.
या विस्तारासाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्या पुढाकार घेत असून, त्यांनी अतिरिक्त उड्डाणांची योजना आखली आहे. उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर विमानतळावरील उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. आठवड्याला सुमारे 1,092 उड्डाणे अपेक्षित असून, दररोज सरासरी 156 उड्डाणे होणार आहेत. सुरुवातीला दररोज 22 उड्डाणांपासून सुरू झालेली सेवा एप्रिल 2026 पर्यंत तब्बल 78 उड्डाणांपर्यंत वाढणार आहे.
टियर-1 आणि टियर-2 शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. एकूणच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यातील महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून वेगाने उभे राहात असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होत आहे.







