| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली परिसरात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून एक कुत्रा अत्यंत वेदनादायक अवस्थेत फिरताना दिसत होता. त्याच्या शरीरात केबल अडकलेली असल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, सतत सावध राहणाऱ्या या कुत्र्याला पकडणे मोठे आव्हान ठरत होते. या कुत्र्याच्या सुटकेसाठी हॅप्पी अम्ब्रेला फाऊंडेशन आणि स्थानिक प्राणीप्रेमी नागरिकांनी वारंवार प्रयत्न केले; परंतु कुत्र्याच्या सतर्कतेमुळे प्रत्येक वेळी प्रयत्न अपयशी ठरत होते. अखेर या संवेदनशील प्रकरणाची दखल घेत बावधन, पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे मदतीची विनंती करण्यात आली. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत पुण्यातून आलेल्या शंतनु लिमये आणि शुभम सिंग या प्रशिक्षित रेस्क्यू टीमने पाली परिसरात कुत्र्याचा शोध घेतला. अनेक तासांच्या संयमी आणि कौशल्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांनी त्या कुत्र्याला कोणतीही अतिरिक्त इजा न होता सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील उपचारासाठी या कुत्र्याला खुरावले येथील हॅप्पी अम्ब्रेला फाऊंडेशन येथे हलविण्यात आले असून, त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. उपचारानंतर हा कुत्रा पूर्णपणे बरा होऊन पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.







