शेतकऱ्यांचा सत्राला मोठा प्रतिसाद
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात घुमणार आधुनिक शेतीचा मंत्र देण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. नानाजी देशमुख प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशनतर्फे डिजिटल शेती शाळा उपक्रम सुरू झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी या सत्राला मोठा प्रतिसाद दिला आहे.
हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि नवनवीन रोगांचा प्रादुर्भावामुळे सध्या शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. या आव्हानांवर मात करून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यात डिजिटल शेती शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. ‘बदलू या रीत शेतीची, वाढवूया रास समृद्धीची’ या ब्रीदवाक्यासह सुरू होणाऱ्या या मोहिमेत कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी या ऑनलाइन शाळेत सहभाग घेताना दिसत आहेत. बदलत्या हवामानानुसार तंत्रज्ञानाची सांगड कर्जत तालुका हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाचे बदललेले स्वरूप आणि वाढत्या उष्णतेमुळे पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून हवामान अनुकूल तंत्रज्ञान ही संकल्पना या शेती शाळेच्या केंद्रस्थानी आहे. ही शाळा पूर्णपणे ‘डिजिटल’ असून, शेतकरी आपल्या स्वत च्या गावातून, आपल्याच मोबाईलवरून तज्ज्ञांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. डिजिटल शेती शाळा एप्रिल महिन्यात चार महत्त्वाच्या टप्प्यांत विभागली गेली आहे. प्रत्येक सत्रात शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यात पेरणीपूर्व नियोजनामध्ये खरीप हंगामाच्या सुरुवातीला करण्यात येणारी तयारी म्हणजे निम्मी शेती जिंकण्यासारखे आहे.
बियाण्यांची निवड, जमिनीची मशागत आणि हवामानाचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन कसे करावे, याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेतीचा खर्च वाढण्यामागे रासायनिक खते आणि महागडी औषधे हे मुख्य कारण आहे. या सत्रात घरच्या घरी सेंद्रिय खते, जीवामृत, आणि इतर निविष्ठा कशा तयार करायच्या, याचे प्रात्यक्षिक व माहिती दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा बाहेरील खर्च कमी होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल असे मार्गदर्शन करण्यात आले.आजचा शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडला जाणे आवश्यक आहे. ही ‘डिजिटल शेती शाळा’ केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून, ती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विशेषतः कर्जत आणि कशेळे परिसरातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे, कारण त्यांना मार्गदर्शनासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
तालुक्यातील सर्व प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी आणि युवा पिढीला या डिजिटल प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या शेतीची रीत बदलण्याची वेळ आली आहे. तरच आपण आपली समृद्धीत वाढ होईल.
दिनेश कोळी,
तालुका कृषी अधिकारी, कर्जत







