| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे जवळपास आठ महिन्यांचे अनुदान रखडले आहे. पनवेल पुरवठा विभागाकडून बिल पाठवण्यास होत असलेल्या उशिरामुळे अनुदानाला विलंब झाला असल्याचे समोर आले आहे.
पनवेलच्या शहरी भागात 10 आणि ग्रामीण भागात नऊ अशी शिवभोजनची 19 केंद्र आहेत. दररोज 2 हजार 350 मंजूर थाळी असून, रोज अंदाजे 2 हजार 200 पेक्षा जास्त थाळीचे वाटप केले जाते. सद्यस्थिती 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी मिळत असून, पनवेल परिसरातील हजारो गोरगरीब, नागरिक या थाळीचा लाभ घेत आहेत.
या दहा रुपयांमध्ये चपाती, भाजी, भात, वरण मिळते. मात्र, आठ महिन्यांपासून शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने पनवेल मधील केंद्र चालकांना हे केंद्र चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. जुलै 25 ते फेब्रुवारी 26 या 8 महिन्याची केंद्र चालकांनी आपापली बिले दिली. मात्र, पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे बिले वेळेवर पाठवण्यात आले नसल्याने त्याचा फटका केंद्र चालकांना बसत आहे. एक-दोन महिन्यात अनुदान मिळेल या आशेवर आठ महिने गेले तरी देखील अनुदान मिळालेले नाही. पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेमुळे अनुदान थकले असल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे. याबाबत पुरवठा अधिकारी, पनवेल यांना विचारले असता केंद्र चालक वेळेवर बिले आणत नाहीत. सात ते आठ जण वेळेवर आणतात आणि जानेवारीपर्यंतची बिले पुढे पाठवली असल्याचे सांगितले.





