आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात 691 कोटी कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून वसूलीचा हा विक्रम केला आहे. मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत महसूल तिजोरीत जमा झाला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत 90टक्के शास्तीमध्ये सूट, त्यानंतर शास्तीमध्ये 75 टक्के सूट मालमत्ता करांमध्ये देण्यात आली होती. या सर्वाचे फलित म्हणजे या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे एकूण 691 कोटी इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मालमत्ता विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे, कर अधिक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही प्रभागामंध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत तसेच, गेला मार्च महिना संपेपर्यंत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता शनिवार, रविवारीदेखील कार्यालये सुरू ठेवली. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरु केली. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी 13 पथके तयार केली होती. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात होती.
विकास कामे करण्यासाठी महापालिकेकडे मालमत्ता कर हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने वेळोवेळी सावध पाऊले उचलली. या आर्थिक वर्षात एकूण 1753 थकबाकीदारांना जप्ती नोटीसा देण्यात आल्या, तर या अटकावणी मोहिमेत 170 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली.
वेळोवेळी मालमत्ताधारकांच्या आक्षेप व हरकतीनूसार त्यांच्या बिलात सुधारणा करुन दिली जात आहे. याचबरोबर यापुढेही मालमत्ताधारकांना त्यांच्या बिलाबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास त्यानूसार त्यांच्या बिलात सुधारणा करण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना किंवा आक्षेप असल्यास तो नोंदवावा आणि आपला मालमत्ता कर भरून पनवेलच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.







