वन विभागाचे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा टिकून आहे. येथील काही वनजमिन ही वनविभागाची असुन काही मालकी हक्काची आहे. त्यामुळे कर्जत तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असा तालुका आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागमध्ये वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी काही ठिकाणी जाणिवपूर्वक वणवे लावले जात आहेत. त्यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली असून वन विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न स्थानिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
कर्जत तालुक्यातील जंगलांमध्ये असंख्य प्राणी व पक्षी यांचे वास्तव्य आहे. त्यातील काही पक्षी आताच्या कालावधीमध्ये घरटे बनवून त्यामध्ये अंडी घालतात. काही पिल्ले नुकतीच अंड्यातून बाहेर पडली आहेत. असे असतानाही कर्जत तालुक्यात मालकी व वन विभागातील जंगलांत बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. तसेच, वृक्षतोड केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्दामुन वणवे देखील लावले जात आहेत. या वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात आली असून येथील प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. या वणव्यात पक्ष्यांची घरटे जळून खाक होत आहेत. जंगलतोडीनंतर जंगलामध्ये वणवा लावला जातो. याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. असे सतत सुरू असून वन विभाग या वणव्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.







