| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डिकसळ शांतीनगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त एक विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. येथील शांतीदूत मंडळ आणि रमाबाई महिला मंडळाच्या वतीने 70फूट लांब आणि 8फूट उंच असा भव्य ऐतिहासिक परिचय देणारा बॅनर लावण्यात आला असून, सध्या हा बॅनर संपूर्ण तालुक्यात चर्चेचा आणि आदराचा विषय ठरत आहे.
या भव्य बॅनरचे वैशिष्ट्य म्हणजे याची आकर्षक मांडणी आणि डिझाईन पुणे येथे करून घेण्यात आली आहे, तर याची छपाई कर्जत शहरात करण्यात आली आहे. हा बॅनर केवळ शुभेच्छा देणारा नसून, तो एक माहितीचा खजिना ठरत आहे. या 70फुटी बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण परिचय देण्यात आला आहे. बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी आणि देशासाठी जे अतुलनीय कार्य केले, त्याची सविस्तर यादी यावर मांडण्यात आली आहे. संविधानाची निर्मिती, महिलांचे अधिकार, कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक न्याय या विषयावर त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतल्यामुळे हा बॅनर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शांतीदूत मंडळ आणि रमाबाई महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. कर्जत तालुक्यात अशा स्वरूपाचा माहितीपूर्ण बॅनर पहिल्यांदाच लावण्यात आल्याने, हा उपक्रम इतर मंडळांसाठी आदर्श ठरत असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.







