| पोयनाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरुषांच्या खुल्या गटाची टी-ट्वेन्टी प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरू आहे. स्पर्धेतील प्ले ऑफ फॉरमॅट मधील एलिमिनेटर फेरीच्या सामन्यात, पेण बाप्पा संघाने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पेण बाप्पा संघाने के.थ्री वॉरियर्स संघावर 3 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करतांना के.थ्री वॉरियर्स संघाने निर्धारित वीस षटकांमध्ये 7 गडी गमावत 154 धावसंख्या उभारली त्यामध्ये निकुंज विठलांनी यांनी दमदार फलंदाजी करत सर्वाधिक 44 धावा काढल्या तर सलामीवीर फलंदाज ओंकार गावडे यांनी 26, विराज कुथे 27, तेजस गिलबिले यांनी 22 धावांची खेळी संघासाठी केली.पेण संघाकडून जबजीत सिंह यांनी 2 ऋषभ शर्मा व सागर मुळे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. 154 धावसंख्येचा पाठलाग करतांना पेण बाप्पा संघानी शेवटच्या षटकात संघाचे 7 फलंदाज बाद झाले असतांना 155 धावसंख्येचे लक्ष पूर्ण केले. त्यामध्ये भावेश पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत सर्वाधिक 59 धावा काढल्या त्याला दुसऱ्या बाजूने विनय ठाकूर यांनी 26, सागर मुळे 25 तर शेखर भगत यांनी बहुमूल्य 23 धावांचे योगदान संघाला देऊन विजय मिळवून दिला.







