| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषदेच्या पर्यावरण, पर्यटन व नियोजन समितीची बैठक समितीचे विद्यमान सभापती शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.13 रोजी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. माथेरान येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे रेनकोट पर्यटकांसाठी विक्री केले जातात. माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने प्लास्टिकच्या रेनकोटवर पूर्णतः बंदी आणावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून सातत्याने होत होती.
त्यामुळे आजच्या सभेमध्ये प्लास्टिकच्या रेनकोट विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समितीने घेतला याची अंमलबजावणी याच मोसमात करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात प्लास्टिकचे रेनकोट पर्यटक जाताना माथेरानच्या जंगलात कुठेही इतरस्त फेकून देतात यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. माथेरानच्या महात्मा गांधी रोडवर मॉल रोडच्या धरतीवर पर्यटकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्याचा देखील महत्त्वपूर्ण निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठेला सौंदर्य प्राप्त होईल असा विश्वास समितीचे सदस्य नगरसेवक मनोज खेडकर, केतन रामाने व सुरेखा साळुंखे यांनी व्यक्त केला. यावेळी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी समीर दळवी उपस्थित होते.







