कोट्यवधींचे साहित्य वापराविना; अरविंद म्हात्रेंच्या पाहणीदरम्यान वास्तव उघड
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कोविड काळात नागरिकांच्या उपचारासाठी उभारलेले कळंबोली येथील अत्याधुनिक रुग्णालय सध्या धूळखात पडून असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. कोट्यवधींचे साहित्य वापराविना असल्याने संताप व्यक्त होत असून, रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
पनवेल महानगरपालिकेकडून कोविड काळात उभारण्यात आलेले कळंबोली येथील रुग्णालय सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, खाटा आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात पडून असून, त्याचा कोणताही वापर होत नसल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सोमवारी (दि. 13) सहकारी नगरसेवकांसह रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीत कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडून असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
कोविडसारख्या गंभीर संकटात उभारण्यात आलेली ही सुविधा सध्या वापरात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पाहणीनंतर अरविंद म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करत रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. “कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले रुग्णालय बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही सुविधा त्वरित कार्यान्वित करणे गरजेचे आहे,” असे अरविंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनीही हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक उपचार केंद्र म्हणून सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देत लवकरात लवकर रुग्णालय कार्यान्वित करावे, असा आग्रह धरण्यात आला आहे.







