वेगवेगळ्या योजनांचा एका छताखाली लाभ
बेलोशीतील नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून रामराज महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लाभार्थी नागरिकांना अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. नुकतेच बेलोशी येथे महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ एका छताखाली देण्याचा प्रयत्न केला. उत्पन्न दाखल्यासह जातीचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, रेशनकार्ड, गावठाण नकाशा अशा अनेक प्रकारचे दाखले एकाच दिवशी शेकडो लाभार्थ्यांना देण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक कोकणे, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोळकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षद देशमुख, महेंद्र विद्रे, अशोक वारगे, रघुनाथ नाईक, रामराजच्या मंडळ अधिकारी समिक्षा मोहिते, बेलोशीचे ग्राम महसूल अधिकारी शशीकांत कांबळे, सुडकोलीचे ग्राम महसूल अधिकारी संतोष बोडके, बोरघरचे ग्राम महसूल अधिकारी अक्षय देशमुख, चिंचोटीच्या ग्राम महसूल अधिकारी दिशा कडू, ग्रामविकासअधिकारी वेटकोळी, महसूल सेवक महेंद्र वादळ, मोहन लोभी, सदानंद पारंगे, प्राची म्हात्रे, कृषी, महसूल, भूमी अभिलेख, अशा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी, बेलोशी ग्रामपंचायतीचे कर्मचारी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रलंबित असलेले दाखले तसेच नागरिकांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे थेट शिबिरातच मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारण्याची गरज कमी होत असून प्रशासन त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांसह महसूल विभागाशी संबंधित दाखले, कागदपत्रे मिळविण्याचा लाभ अशा शिबिरांतून घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले आणि प्रशासनाकडून मार्गदर्शन घेतले. अशा उपक्रमांमुळे शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असून लोकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यास मदत होत आहे, असे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.






