रस्त्यांच्या कामाचा बोजवारा; आंबा, भाजीपाला, वीटभट्टीला फटका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते कामांचा बोजवारा, आंबा उत्पादनाला बसलेला फटका, भाजीपाला पिकांचे नुकसान आणि वीटभट्टी व्यवसायावर ओढावलेले संकट या सर्वांचा एकत्रित तडाखा अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. 21) दिला. अलिबाग, मुरुडसह जिल्ह्यातील अनेक भागात पहाटे कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे शेतीचे नुकसान झाले चिंतेत असून, व्यावसायिकांवरही आर्थिक संकट ओढावले.
ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अलिबाग, मुरुड, खोपोली, पनवेल, महाड, पोलादपूर, माणगाव या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे सध्या सुरू असलेल्या आंबा काढणी हंगामावर मोठे संकट आले आहे. तयार आंब्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, आधीच हवामान बदलाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भातपिकानंतर घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर वीटभट्टी व्यवसायात तयार कच्च्या विटा भिजल्याने मोठे नुकसान झाले असून, प्लास्टिक आच्छादन करूनही अनेक ठिकाणी तूस भिजल्याने हानी झाली आहे.
दरम्यान, एमएमआरडीए व एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्ते कामांमधील निष्काळजीपणा अवकाळी पावसात उघड झाला. महाजनेवावे-चौल मार्गासह अनेक ठिकाणी खोदकामामुळे तयार झालेल्या खड्ड्यांत पाणी साचले असून, रस्ते चिखलमय झाले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
लग्नाच्या आनंदावर पावसाचे विरजण
जिल्ह्यात लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच अवकाळी पावसाने आनंदावर पाणी फेरले. मंगळवारी होणाऱ्या अनेक समारंभांसाठी उभारलेले मंडप भिजून गेले, तर काही ठिकाणी मंडपात पाणी साचल्याने तयारीवर परिणाम झाला. ऐन उत्सवाच्या क्षणी आलेल्या पावसामुळे लग्नसोहळ्यांचा उत्साह कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
अपघातांचा धोका वाढला चौल-रेवदंडा मार्गावर सुरू असलेल्या कामाचा दर्जा अवकाळी पावसात उघड झाला. काही मिनिटांच्या पावसातच रस्ता चिखलात बदलला. दुचाकीस्वार घसरून अपघाताच्या धोक्यात आले, तर चारचाकी वाहने अडकून पडली. टायरला चिकटलेला चिखल रस्त्यावर साचल्याने प्रवास अत्यंत धोकादायक झाला. नागरिकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
कच्च्या विटा वाचवण्यासाठी धावपळ
पाताळगंगा : अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कच्च्या विटा भिजू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लास्टिक व ताडपत्री टाकून संरक्षण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. एप्रिल महिन्यातच आलेल्या या अनिश्चित पावसामुळे पुढील नुकसानाची भीती व्यक्त होत असून, वीटभट्टी मालक चिंतेत आहेत. मेहनतीने तयार केलेल्या विटांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वत्र धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले.









