हजारो झाडांची कत्तल; हिरवाई ऐवजी ओसाडपणा
| माणगाव | प्रतिनिधी |
गेल्या तब्बल 16 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे केवळ विकासाचे स्वप्नच धुळीस मिळाले नाही, तर पर्यावरणाचाही मोठा बळी गेला आहे. या महामार्गालगत लावण्यात आलेली झाडे प्रचंड उष्णता, पाण्याअभावी आणि देखभालीच्या अभावामुळे करपून नष्ट झाली आहेत. परिणामी, कधी हिरवाईने नटलेला हा रस्ता आज ओसाड माळरानासारखा दिसू लागला आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासकीय आकडेवारीनुसार सुमारे 68 हजार जुन्या, विशाल वृक्षांची कत्तल करण्यात आली. मात्र, स्थानिकांच्या मते प्रत्यक्षात हा आकडा याहून अधिक असून हजारो झाडे निर्दयपणे नष्ट झाली. यामुळे प्रवाशांना मिळणारी हक्काची सावली अक्षरशः नाहीशी झाली आहे. काही किलोमीटरपर्यंत एकही झाड दिसत नसल्याने उन्हाचा तीव्र तडाखा सहन करत प्रवास करावा लागत आहे.
या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत दुतर्फा तब्बल एक कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ 9 ते 10 हजार झाडांची लागवड झाल्याचे दिसून येते. ही बाब म्हणजे पर्यावरणीय बांधिलकीची उघडपणे केलेली फसवणूक असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र, हा महामार्ग होण्यापूर्वीच टोल नाका उभारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वी या महामार्गालगत आंबा, जांभूळ, पळस, बहावा, पिंपळ, वड यांसारखी सावली देणारी, फळझाडांनी समृद्ध अशी झाडे होती. या झाडांमुळे प्रवास सुखद, थंडावा देणारा आणि निसर्गरम्य व्हायचा. मात्र, विकासाच्या नावाखाली ही सर्व हिरवाई कायमची नाहीशी झाली असून ङ्गरस्ताफ मिळाला, पण ङ्गनिसर्गफ हरवला, अशी खंत प्रवासी व्यक्त करत आहेत.
महामार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा लोकप्रतिनिधी करत असले, आणि जूनपर्यंत काम पूर्ण होईल अशी आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा प्रकल्प पुढील वर्षीच पूर्ण होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या महामार्गावर मूलभूत सुविधांचाही अभाव प्रकर्षाने जाणवतो. शौचालयांची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली असून, अपघाताच्या वेळी जखमींना साधे पाणीही उपलब्ध होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.डोंगर उत्खनन, जंगलांची तोड आणि झाडांची कमतरता यामुळे परिसरातील तापमान लक्षणीय वाढले आहे. सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावरून परावर्तित होणारी उष्णता प्रवास अधिकच असह्य करत आहे. जर गेल्या 16 वर्षांत नियोजनबद्ध वृक्षलागवड झाली असती, तर आज हा महामार्ग पर्यावरणपूरक, सावलीदार आणि सुखद अनुभव देणारा ठरला असता. आता तरी प्रशासनाने जागे होऊन येत्या पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी, तसेच त्यांची नियमित देखभाल सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी कोकणातील नागरिक आणि प्रवासी करत आहेत.
पर्यावरणप्रेमींची नाराजी
हरवलेली हिरवाई परत मिळवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पर्यावरणप्रेमी देत आहेत.






