| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रातच चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जी-12 रॅम्प ऑफिसमधून मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीस गेल्याने सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अच्युत बबन पाटील (31) यांनी नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अच्युत पाटील हे इंडिगो एअरलाईन्समध्ये लोडर म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासोबत अभिषेक परमेश्वर उपाडे (22) हेही काम करतात. शुक्रवारी (दि.1) सकाळी दोघेही कामावर हजर झाले होते. त्यांनतर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी आपले ॲपल कंपनीचे मोबाईल फोन बॅगेमध्ये टाकून ते जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये ठेवले. मात्र, साडेअकरा वाजता परत त्या ठिकाणी आल्यानंतर बॅगेतील मोबाईल फोन गायब असल्याचे उघड झाले. सुरुवातीला मस्करीचा संशय घेतला गेला; परंतु, बराच वेळ शोध घेऊनही मोबाईल न सापडल्याने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. याबाबत इंडिगो एअरलाईन्सच्या मॅनेजर प्रभा यांनाही माहिती देण्यात आली. परंतु, कोणताही ठोस सुगावा लागला नाही.







