प्रवासी वर्गातुन संतप्त प्रतिक्रिया
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे महिन्या अखेर करण्याच्या इराद्याने युद्ध पातळीवर सुरु आहे. हे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे, असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले; परंतु, या घाई गडबडीत करण्यात येणाऱ्या कामामुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा आहे, हे सुकेळी खिंडीतील रस्त्याला गेलेल्या तड्यांमुळे दिसून येत आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे. तरी काम पूर्ण झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी 2018,2021,2024 अशा अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या. परंतु, हे आश्वासन फेल ठरले आहे. सध्या या चौपदरीकरणाचे काम 95 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. असे असले तरी काही ठिकाणी असलेले उड्डाण पुल, गटारांच्या कामांसह इतर कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मे अखेर देखील मुंबई-गोवा महामार्गाचे कार्म पुर्णत्वास जाण्याची आशा देखील मावळली आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या चौपदरी करणाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, या महामार्गाच्या रस्त्याचे उद्घाटन करण्याच्या अगोदरच या रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे रस्ता बनविताना वापरण्यात आलेले स्टील बाहेर आले आहे. तर, काही ठिकाणचे रस्त्यावरील तडे सिमेंट मिश्रित खडीने भरण्यात आले आहेत. परंतु, पाऊस पडल्यानंतर या भेगेत पाणी जाऊन रस्त्यावरील तडे अधिक रुंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी अनेक ठेकेदार आले आणि अनेक अपूर्ण कामे सोडून गेले. त्यामुळे अनेकदा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाला प्रवाशांच्या जिवाची किंमत राहिली नाही का? याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून उपस्थित केला जात आहे.







