। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमधील करंजाडे नोड परिसरात सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
पीडित मुलगी अवघी १५ वर्षांची असून, आरोपी हा तिचा सावत्र पिता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला पित्याच्या नात्याचा आधार घेत आरोपीने मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरात आई नसताना तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. भीतीपोटी मुलगी दीर्घकाळ गप्प राहिली होती. काही कारणांमुळे आरोपी आईपासून दूर गेल्यानंतर पीडित मुलीने धाडस करून आईसमोर आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. मुलीकडून सारा प्रकार समजताच आईने तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही इतर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर हे या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस म्हणाले.







