| पुणे | प्रतिनिधी |
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केट बॉलमध्ये पूर्व उपांत्य
फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. 7) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात 12 विरुद्ध 5 गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.







