। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या महाड शहराच्या हद्दीत दोशी पेट्रोल पंपाजवळ डंपरचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास डंपर चालक डिझेल भरून जात असताना घाईगडबडीत आजूबाजूला न पाहाता डंपर अचानक पुढे घेतल्याने डंपरची दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार शिरीष शिंदे (रा. किंजळोली बौद्ध वाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात दुचाकीस्वार शिरीष शिंदे आपल्या घरी जात असताना घडला. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमधील वस्तुस्थिती पाहता, महाड पोलिसांनी डंपर चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करीत आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गनजीक तसेच सर्विस रोडवर असणाऱ्या या काही पेट्रोल पंपांच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपसून सुरू असलेली कामे पाहता या पेट्रोल पंपांवर संबंधित यंत्रणांकडून सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी केली जात आहे.







