| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीने नालेसफाई व कचरा उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने डेंगूची साथ पसरली आहे. डाऊर नगर येथे आतापर्यंत 3 जणांना डेंगूची लागण झाली असून, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डेंग्युची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असल्याने येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशातच या परिसरातील रहिवाशांना पाणी पुरवठा हा अपुरा होत असल्याने येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करत आहेत. त्यामुळे या साठवणूक केलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. तसेच, नाले व उघड्या जागा हे कचऱ्याने तुडुंब भरल्याने मच्छरचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ग्रामपंचायतीने नालेसफाई, औषध फवारणी किंवा गटारे स्वच्छ करण्याची मोहीम अध्याप हाती घेतली नाही. परिणामी गेल्या 15 दिवसांत गावात डेंगूचे 3 रुग्ण आढळले. त्यातील एका 22 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य 4 जणांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चांणजे ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाने या परिसरात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, साठवणूक केलेल्या पाण्याचा वापर हा सुरक्षित पर्यायाने करावा, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. चाणजे ग्रामपंचायतीने तातडीने साफसफाई करण्याकडे लक्ष केंद्रित केला असून रहिवाशांनी घाबरून न जाण्याचे आवाहन ही केले आहे.






