तातडीने दुरुस्ती करण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
सापे वामने रेल्वे स्टेशनवरून पायी जाण्यासाठी महत्त्वाचा पर्याय असलेल्या नागेश्वरी नदीवरील वामने-तुडील लोखंडी पुलाची दुरवस्था झाली असून, यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांकडून संबंधिताना पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती.
नागेश्वरी नदीच्या दोन्ही बाजूला सुमारे 20 ते 25 गावे वसलेली आहेत. वामने, तुडील, भेलोशी, कुडूक, आदिस्ते, खुटील आणि आदे यांसारख्या अनेक गावांतील नागरिक या पुलाचा बारमाही वापर करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून देखभाली अभावी या लोखंडी पूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही वर्षांपूर्वी या लोखंडी पुलावरून पडून वामने गावातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती, या घटनेतून त्या अजूनही सावरलेल्या नाहीत.
या भागातील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे गावी येताना ते कोकण रेल्वेच्या सापे वामने स्थानकाचा वापर करतात. मात्र, रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत जाण्यासाठी हा एकच पुल असल्याने इतर कोणत्याही पुलाची सुविधा उपलब्ध नसल्याने बस सेवा सुद्धा उपलब्ध नाही. इतर मार्गाने प्रवाशांना 10 किलोमीटरच्या अंतरासाठी 250 ते 300 रुपये रिक्षाचे भाडे मोजावे लागते.
पावसाळ्यात नागेश्वरी नदीचे पात्र पूर्णतः भरून वाहते. अशा वेळी कमकुवत पुलावरून ये-जा करणे जीवघेणे व जिकरीचे ठरू शकते. मोठी जीवितहानी होण्यापूर्वी या पुलाचे किमान वेल्डिंगचे काम होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा नवीन पूल बांधावा, अशी कळकळीची विनंती स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.






