| पनवले | प्रतिनिधी |
मे महिन्यातील कडक उन्हामुळे पनवेलचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण सुकण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. या धरणातील बहुतांश भाग कोरडा पडला असून, केवळ काही ठिकाणी पाण्याचे छोटे साठे शिल्लक राहिले आहेत. उरलेल्या पाण्यावर परिसरातील महिला वर्ग कपडे धुताना दिसत असून, भीषण पाणीटंचाईची झळ स्पष्टपणे जाणवत आहे. धरणाच्या विदारक अवस्थेमुळे आगामी दिवसांत पाणी संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांसह जनावरांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण कडक उन्हामुळे झपाट्याने सुकत असल्याचे चित्र असताना काही ठिकाणी गाळ व माती काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. या कामासाठी संबंधित विभागाची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धरण क्षेत्रातील हालचालींमुळे पर्यावरण व जलसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.







