। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी पुलावर शुक्रवारी (दि.15) पहाटे भीषण अपघात होऊन ब्रिंक्स कंपनीच्या व्हॅनमधील दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान चारोटी पुलावर गंभीर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुंबईकडून गुजरातकडे जाणारी ब्रिंक्स कंपनीची व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकावर चढली. त्यानंतर समोरून गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक बसली.
या भीषण धडकेत व्हॅनमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त व्हॅनमध्ये चांदीच्या 20 विटा तसेच एक लोडेड रिव्हॉल्वर आढळून आले. सुमारे 17 कोटी रुपयांचा मुद्देमाल असल्याने कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तो ताब्यात घेतला आहे. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार अपघातग्रस्त व्हॅन रस्त्याच्या दुभाजकावरून हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात मनोर पोलीस केंद्राच्या हद्दीत घडल्याने संबंधित माहिती प्रभारी अधिकारी पवन ठाकूर यांना देण्यात आली असून, त्यांचा कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल झाला आहे. पुढील तपास कासा पोलीस ठाणे करीत आहे.







