खारपाडा ग्रामस्थ आक्रमक
| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथील टोलनाका सुरू करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना टोल आकारणी सुरू केल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ग्रामस्थांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली करता येत नसताना संबंधित यंत्रणांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवले जात आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, खड्डेमय रस्ते, अपूर्ण सेवा रस्ते, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत टोल आकारणी म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना वाहन चालकांनी व्यक्त केली. टोल नाका तात्काळ बंद करून महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.







