| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ येथे ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नो हाऊ फाऊंडेशन (इनोरा) यांच्या तंत्रज्ञानातून व अदानी फाऊंडेशनच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या कंपोस्टर प्लांटर प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थांना ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, रंजना वासकर, मनीषा पाटील, सुबोध सिंग, मंजुश्री तडवळकर व आभा तडवळकर, नो हाऊ फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त, कुंडेवहाळ ग्रामपंचायतचे सदाशिव वास्कर, विजय भालेकर, इनोरा पदाधिकारी रविंद्र जाधव, इनोरा पदाधिकारी आदित्य जोशी, ग्रामपंचायत प्रशासक संतोष ठोंबरे, तसेच ग्रामपंचायत ओवळेचे रुपेश गायकवाड यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळचे ग्रामस्थ व पनवेल तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







