| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहराच्या क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला नवी ओळख देणारे अत्याधुनिक, सर्व सुविधांनी सुसज्ज असे ‘स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल’ नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्वर्गीय नमिता नाईक यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या भव्य क्रीडा संकुलामुळे अलिबागकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून, शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुरुवारी (दि.21) या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला रघुजीराजे आंग्रे, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, प्रदीप नाईक, ॲड. प्रवीण ठाकूर, ॲड. निलम हजारे, अनिल चोपडा, सुषमा पाटील, संतोष गुरव, संध्या पालवणकर, ॲड. अश्विनी ठोसर, ॲड. ऋषीकेश माळी, आनंद पाटील, ॲड. निवेदिता वाघमारे, समीर ठाकूर, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत, ॲड. अंकीत बंगेरा, संदीप पालकर, श्वेता पालकर, जमाल सय्यद, वृषाली ठोसर, ॲड. गौतम पाटील, महेश शिंदे, संजना कीर, प्रिया वेलकर, सत्यजीत दळी, मिलिंद चव्हाण यांच्यासह अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी आधुनिक आणि सर्वसमावेशक क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न स्वर्गीय नमिता नाईक यांनी पाहिले होते. लहान मुलांपासून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी विविध क्रीडा आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या संकुलाची संकल्पना मांडण्यात आली होती. शहराला स्वतःचे सुसज्ज आणि हक्काचे क्रीडा संकुल मिळावे यासाठी नगरपरिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
या प्रकल्पासंदर्भातील ठराव 28 जून 2016 रोजी नगरपरिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला आणि श्रीबाग परिसरातील जागा या क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आली. त्यानंतर 18 जुलै 2016 रोजी भाऊसाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. पुढे या क्रीडा संकुलाला स्वर्गीय नमिता नाईक यांचे नाव देण्याचाही ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सुमारे 22 गुंठे जागेवर उभारण्यात आलेले हे भव्य क्रीडा संकुल तळमजला आणि पहिला मजला अशा दोन स्तरांमध्ये विकसित करण्यात आले आहे. तळमजल्यावर अभ्यागत कक्ष, स्विमिंग पूल, कॅरम विभाग आणि बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. तर, वरच्या मजल्यावर योगा कक्ष, अत्याधुनिक जिम आणि टेबल टेनिससाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. याशिवाय स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वच्छतागृहे आणि इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 5 कोटी 54 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि नगरपरिषद निधीतून हे संकुल उभारण्यात आले आहे. याशिवाय आधुनिक जिम साहित्य खरेदीसाठी स्वतंत्रपणे 69 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या संकुलाचे बांधकाम चेंढरे येथील नागडोंगरी परिसरातील मे. आनंद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पूर्ण केले आहे.
क्रीडा संकुलात वातानुकूलित व्यायामशाळा, अत्याधुनिक व्यायाम साहित्य, स्वच्छता सुविधा आणि दर्जेदार क्रीडा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये अद्ययावत क्रीडा संकुलाची उणीव अनेक वर्षांपासून जाणवत होती. मात्र, आता ‘स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल’ उभे राहिल्याने अलिबागकरांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी हे क्रीडा संकुल अधिकृतपणे नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या संकुलामुळे अलिबाग शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, शहरातील युवक आणि क्रीडाप्रेमींना नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच अलिबागमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.









