आंब्यासह जांभूळ, करवंदांना मोठी मागणी
| माणगाव | सलीम शेख |
उन्हाळा म्हणजे रान फळांची मेजवानी घेऊन येणारा ऋतू असतो. इतर कोणत्याच ऋतूत न मिळणारी फळे, फुले खास या ऋतूत मिळतात. त्यामध्ये जांभळं, करवंदं, आठुरणी, कोकम इत्यादी फळांचा समावेश असतो. उन्हाळी दिवसांत तयार होणारी ही फळे म्हणजे खवय्यांसाठी चविष्ट असा गोडवाच असतो. तसेच, ग्रामीण भागातील महिलांना देखील हक्काचा रोजगार उपलब्ध होतो.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर आंबा, काजू इत्यादी फळांवरोबर सर्वसामान्यांच्या आवडीची असलेली खास गोडव्याची फळे म्हणजे जांभळे आणि करवंदे होत. रानाची मैना म्हणून करवंदांच्या उल्लेख केला जातो. कोकणातील डोंगर रांगात दिसणाऱ्या लहान-मोठ्या विस्तीर्ण अशा करवंदाच्या जाळी विविध पशुपक्ष्यांसाठी निवारा तर असतोच त्याबरोबरीने उन्हाळी दिवसात हिरव्या पानातून डोकावणारी काळाकभिन्न करवंदांची फळे सर्वांनाच आवडतात. आंबट-गोड चवीला लागणारी ही करवंदांची फळे म्हणजे खास उन्हाळ्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापासून सुगरणी चविष्ट चटणी व लोणची तयार करतात.
करवंदांप्रमाणे डोंगर भागात जांभळीची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उन्हाळी दिवसात तयार होणारे तुरट गोड चवीची फळे खायला चविष्ट असतात. जांभळाचे आयुर्वेदात असंख्य उपयोग सांगितले आहेत. जांभळे मधुमेहींसाठी खास औषधी म्हणून आहेत. हाडकी, मांसवाली, मनुकांच्या आकाराची तर काही टपोरी असणारी जांभळे खवय्यांसाठी पर्वणी असते. तसेच, लालचुटुक रंगांनी मन वेधून घेणारी कोकमाची फळे ही या ऋतूमध्ये तयार होतात. आमसूल, सरबत तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली ही फळे गृहिणींच्या खास आवडीचे असतात. आयुर्वेदातही या फळांचे अनेक उपयोग, गुणधर्म सांगितले आहेत. तसेच, आठूरणी, मंदुकली इत्यादी लहान-मोठी फळे खवय्यांसाठी पर्वणी असते. या रांमेव्याव्याच्या विक्रीतून ग्रामीण भागातील अनेक महिलांना हक्काचा रोजगार मिळतो.
आरोग्यदायी रानमेवा
उन्हाळ्यातील रान मेव्याचा हा गोडवा खवय्यांच्या पसंतीचा असून, याची चव वर्षभर मनात रेंगाळत राहते.खास करून कोकणात वैशिष्ठ्य पूर्ण असलेली ही रानफळे आहारात उपयुक्त असून, आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. उन्हाळा ऋतू संपत असताना पुढील काही दिवसांत रानमेव्याचा आनंद भरभरून घेतला जाईल. रान फळांचा हा हंगाम खास वटपौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. वटपौर्णिमेच्या निमीत्तानेही रान मेव्याला चांगली मागणी असते. सुवासिनी आवर्जून या रान फळांनी वाण सजवितात. तसेच, रानफळांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळतो.







