। धुळे । प्रतिनिधी ।
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जवळील लळींग घाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाल्याची घटना घडला आहे. रेतीचा डंपर, ट्रक आणि एक खाजगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 26 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास लळींग घाटात आधी रेतीने भरलेला डंपर आणि एका ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग पथक आणि महामार्गावरील टोल कर्मचारी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. हे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदतकार्य करत होते.
मदतकार्य सुरू असतानाच, मागून येणाऱ्या एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसने नियंत्रण सुटल्यामुळे घटनास्थळावरील ट्रक आणि डंपरला भीषण धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी आणि तिथे मदत करत असलेला टोल कर्मचारी चिरडला गेला. या भीषण अपघातामुले 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. सहकारी कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टोल कर्मचारी घटनास्थळी आक्रमक झाले होते.
या भीषण अपघातातील 26 जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ धाव घेत वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, धुळे पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.







