निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप; बळीराजा फाऊंडेशन आक्रमक
| चणेरा | प्रतिनिधी |
आंबेवाडी ते निवी परिसरातील कालवा दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. अनेक ठिकाणी नव्याने करण्यात आलेले लायनिंग काँक्रीटीकरण अवघ्या दोन वर्षांत उखडू लागले असून, कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला आहे.
सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजवा व डावा तीर कालव्यांवरील लायनिंग मास काँक्रीटीकरण कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी राजकीय दबावाखाली निकृष्ट कामे करून काही ठेकेदार, अधिकारी व संबंधित मंडळींनी आर्थिक लाभ घेतल्याची चर्चा रंगली होती. आता त्याच पद्धतीने कालवा दुरुस्तीच्या कामांमध्येही निकृष्ट दर्जा समोर येत असल्याने जुन्या सिंचन घोटाळ्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
बळीराजा फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाणी आंदोलनानंतर रखडलेली कालवा दुरुस्तीची कामे सुरू झाली होती. शासनाकडून यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, अनेक एस्कॅप, सायफन आणि लायनिंग काँक्रीटची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. विशेष म्हणजे पाले खुर्द गावाजवळ करण्यात आलेले लायनिंग काँक्रीटीकरण अवघ्या दुसऱ्याच वर्षी उखडू लागल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून कालव्यातून पाणी गळती वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून पाणी व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पुन्हा नव्या कामांचे ठेके दिले जात आहेत. पाले खुर्द परिसरातील काम एका बाहेरील ठेकेदाराने केल्याची माहिती समोर आली असून, त्याच ठेकेदाराला पुन्हा कामे देण्यात येत असल्याने संशय अधिकच बळावला आहे. “कामे उखडत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या देखरेखीखालीच निधीचा अपव्यय झाला आहे,” असा आरोप स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आंबेवाडी, संभे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामापूर्वी सर्व दुरुस्ती कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, कालव्याचे पाणी पूर्ववत सुरू करावे आणि गळती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बळीराजा फांऊडेशनतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे कोलाड पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
कालवा दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले आहे; परंतु, प्रत्यक्षात कामांची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. अनेक ठिकाणी कालवा अजूनही गळती अवस्थेत आहे. या सर्व कामांची आणि बिलांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.
विठ्ठल मोरे,
अध्यक्ष, बळीराजा फाऊंडेशन
शासनाच्या निधीचा उघडपणे अपव्यय झाला आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. पाणी सोडण्याचे योग्य नियोजन नाही. शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
ॲड. दीपक भगत,
सचिव, बळीराजा फाऊंडेशन







